पिंपळकोठा ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करा !

एरंडोल : तालुक्यातील पिंपळकोठा प्र.चा. येथे पाणीटंचाई ही जणू काही पाचवीलाच पुजलेली आहे. ‘कायम पाणीटंचाईग्रस्त गाव’ अशी या गावाची ओळख होऊ पाहत आहे. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा विहीरीने कधीच तळ गाठला असल्याने अवघा 30 ते 40 मिनिटे पाणीपुरवठा बारा ते पंधरा दिवसाआड होत आहे. यामुळे येथील अबाल वृद्धांवर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे.

गावात अवघे तीन ते चार हात पंप सुरू असून याच पंपांवर गावातील पाण्याची मदार अवलंबून आहे. शेतातून थकून भागून आल्यानंतर ग्रामस्थांसह महिलांना पाणी आणणे हा एकमेव उद्योग राहिला आहे. येथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर गिरणा नदी आहे. गिरणा काठावरील कढोली येथून दीड वर्षांपूर्वी नवीन पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनी पाण्याबाबत सुटकेचा निःश्वास श्वास सोडला, पण तो केवळ ग्रामस्थांचां भ्रमनिरास ठरला. या विहिरीचे पूर्णपणे खोदकामच करण्यात आले नसल्यामुळे या विहिरीने तळ गाठला असल्याचे  समजते. ग्रा.प पदाधिकाऱ्यांकडून येथे पाणी पूरेसे नसल्याचे सांगण्यात येते.

शासनाची हागणदारी मुक्ती योजना येथे पाण्याअभावी फोल ठरली आहे. घरातील शौचालयात जास्त पाणी लागते म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करावा या हेतूने गावातील ग्रामस्थांना शौचालयासाठी गावाबाहेर जावे लागत आहे. महिलांनाही तब्बल शौचालयासाठी रस्त्यावर जावे लागत असून, ही महिलांसाठी अपमानास्पद बाब ठरत आहे.

अंघोळ, स्वयंपाक ,धुनी भांडे याबाबत महिला पाण्याचा काटकसरीने वापर करत आहेत. तर दहा ते पंधरा दिवस पाणी साठवायचे म्हटल्यास घरात पातेले सुद्धा पाण्याने भरून ठेवावे लागत आहेत.

गावात दुग्ध व्यवसाय हा जोड धंदा असून गाई , बैलं, म्हशी हे पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. गावात पाण्यासाठी कुठलीही हाळ भरली जात नाही. त्यासाठी आपल्या जनावरांना घेऊन जंगलात पाण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभाला जर ही परिस्थिती आहे, तर अजून पावसाळ्यापर्यंतचा काळ थोडा थोडका नसून तब्बल सहा महिने काढावयाचे आहेत. तोपर्यंत पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होतील या विचारानेच ग्रामस्थांच्या डोळ्यात आज पाणी येत आहे.

गावातील पाणीटंचाई बाबत ग्रा.प प्रशासनाला कुठलेही सोयरसुतक नसल्यामुळे गावातील पाणीटंचाई आणि पुढील तीव्र उन्हाळा पाहता जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी गावात भेट देऊन तातडीने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.