पिता-पुत्र एकाच दिवशी झाले फौजदार

नंदुरबार : जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर बामखेडा (ता.शहादा) येथील पिता-पुत्राने एकाच दिवशी पीएसआय होण्याचा बहुमान मिळवलाय. मुलाने स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होत हे यश गाठले असून, पोलिस पित्याने विभागांतर्गत दिलेल्या परीक्षेच्या माध्यमातून फौजदारकी मिळवलीय. पिता-पुत्राने एकाच दिवशी मिळवलेल्या या यशाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल १ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. बामखेडा (ता.शहादा) येथील मूळ रहिवासी असलेले गुरुदत्त पानपाटील हे शिरपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील वाचक शाखेत सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी विभागांतर्गत पीएसआय पदासाठी परीक्षा दिली होती. त्यांचा मुलगा रोहन हादेखील अनुसूचित जाती संवर्गात राज्यातून ३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. ही बातमी पानपाटील कुटुंबीयांच्या घरी कळल्यानंतर एकच आनंदोत्सव सुरु होता.

पिता-पुत्राने एकाच वेळी पीएसआय परीक्षा पास करण्याचा हा अनोखा योगायोग जुळून आला आहे. रोहनचे वडील गुरुदत्त पानपाटील १९९१ साली पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांनी ३३ वर्षे सेवा बजावली आहे २०१३ मध्ये त्यांनी पोलीस खात्याअंतर्गत आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. १ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे हे आदेश जारी करण्यात आले.

पिता-पुत्राला एकाच दिवशी उपनिरीक्षक पदाची संधी मिळाल्याबद्दल धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी कौतुक केले.