जळगाव । पितृपक्षात कुठलेही शुभकार्य करू नये, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये सोने-चांदी वा इतर वस्तूंची खरेदी करण्यात येत नाही. याचा परिणाम पितृपक्ष सुरु होताच दिसून आला. पितृपक्ष लागताच सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
खरंतर गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे भाव वधारले. ७२ हजाराच्या घरात असलेला सोन्याचा भाव ७४ हजार रुपयावर गेला तर चांदीचा दर ८३ हजार रुपयांवरून ९० हजार रुपयावर गेला. ऐन गणेत्सवात दोन्ही धातूंचे दर वाढल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र आता भाव घसरले.
या आठवड्यात सोमवार वगळता इतर दोन दिवस मौल्यवान धातूत घसरण झाली. जळगावच्या सुवर्णपेठेत गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरांमध्ये प्रति दहा ग्रॅम ६०० रुपयांची घट दिसून आली. यामुळे मंगळवारी ७४,४०० रुपये (विना जीएसटी) प्रति तोळ्यावर असलेला सोन्याचा भाव आज सकाळी ७३,८०० रुपयावर (विना जीएसटी) आला आहे. तर चांदी दरात १००० ते १२०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे सध्या चांदीचा एक किलोचा भाव ८९००० (विना जीएसटी) रुपयावर आला आहे.
दरम्यान, पितृपक्षानंतर सुरू होणारे नवरात्र आणि दिवाळीदरम्यान सोने खरेदी वाढेल. आपल्याकडे तुळशी विवाहानंतर लग्नकार्ये सुरू होतात. त्यासाठी नवरात्रीच्या काळात सोने खरेदी अधिक प्रमाणात होणार आहे. तसेच दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दोन मुहूर्तांना हमखास उलाढाल होते. परिणामत: पितृपक्षाचे दिवस थंड असले तरी त्यानंतरचा काळ सराफा बाजारासाठी चांगला राहणार असल्याचं जाणकारांचे मत आहे.