नवी दिल्ली : पीएच.डी. (PhD) करण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र कधी तांत्रिक अडचणी किंवा कधी किचकट नियमांमुळे पीएच.डी.पूर्ण करता येत नाही. मात्र आता पीएच.डी.बाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नवी नियमावली जाहीर केली आहे. यात मोठे बदल करण्यात आले असून नव्या नियमावलीत पीएचडी (PhD) प्रवेशप्रक्रिया, पात्रता यासह अर्धकालीन पीएचडीसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
शोधनिबंधांसंबंधातील नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी २०१९ मध्ये एक अभ्यासगटाची स्थापना आयोगाने केली होती. या गटाच्या सूचनेनुसार शोधनिबंधांबाबतचा बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार, पीएचडी प्रबंध सादर करण्यापूर्वी पीअर-रिव्ह्युड जर्नल्समध्ये शोधनिबंध (Research Paper) सादर करण्याची अट विद्यापीठ अनुदान आयोगाने रद्द केली आहे. अशा जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांना पीएचडीच्या दृष्टीने शैक्षणिक मूल्य राहणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
यूजीसीने २०१६ च्या नियमावलीत बदल करून यूजीसी (पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी किमान मानके आणि कार्यपद्धती) नियमन, २०२२ लागू केले आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास,
१) चार वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना थेट पीएचडी करता येईल. यासाठी ७५ टक्के गुणांची किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तीन वर्षाची पारंपारिक पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दोन वर्षाची पदव्युत्तर डिग्री अनिवार्य असेल.
२) पीएचडीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५५ टक्के गुण आवश्यक असतील. नव्या शैक्षणिक धोरणानुसार एम. फिल अभ्यासक्रम बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे एम. फिल करून पीएचडी करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना राहणार नाही.
३) पीएचडीच्या प्रवेश प्रक्रियेत फार बदल केले गेलेले नाही. नेट, जेआरएफ सारख्या प्रवेश परीक्षांसह विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा मान्य राहतील. प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात ५० टक्के भर संशोधन कार्यपद्धती तर ५० टक्के भर विषयावर राहील. प्रवेश परीक्षेत ७० टक्के भर लिखित परीक्षेवर तर ३० टक्के मुलाखतीतील गुणांवर राहील.
४) आयआयटीच्या धर्तीवर पार्ट टाईम पीएचडीची मुभा देखील नव्या नियमावलीत विद्यार्थ्यांना दिली गेली आहे. पार्ट टाईम पीएचडी करण्यास इच्छुकांना कार्यस्थळावरून ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. संशोधनासाठी पुरेसा वेळ पुरवू याची हमी या प्रमाणपत्रात देणे आवश्यक असेल. पार्ट टाईम पीएचडी आणि फुल टाईम पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांसाठी सर्व नियम सारखे राहतील.