पुढील ४८ तास धोक्याचे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ धडकणार!

तरुण भारत लाईव्ह । नवी मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या २४ ते ४८ तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. संभाव्य वादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. या चक्रीवादळाचे नामकरण ‘बिपरजॉय’ असे करण्यात आले आहे.

अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील २४ ते ४८ तासांत उत्तरेकडे सरकण्याचा आणि अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्टयाचे चक्रीवादळात रुपांतर होऊन ८ ते ९ जूनदरम्यान हे चक्रीवादळ तीव्र होऊ शकते. यावेळी समुद्र खवळलेला असेल आणि वार्‍याचा वेग ताशी ९० किमी इतका असू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात धडकले होते. या वादळाला ‘मोचा’ असे नाव दिले गेले होते. आता अरबी समुद्रात तयार होणार्‍या चक्रीवादळाचे नाव ‘बिपरजॉय’ असेल. बांगलादेशने हे नाव दिले आहे. कोकणसह, मुंबई, पालघर आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा फटका बसण्याची भीती आहे.