भुसावळ : साकेगाव येथे महिलेच्या घरातून 22 हजारांच्या बनावट नोटा तालुका पोलिसांनी जप्त केल्यानंतर लाखोली, ता.जामनेर येथील आरोपीच्या घरातून पुन्हा 20 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी पोलिसांनी जळगाव येथील एका संगणक दुरूस्ती करणार्या दुकानातून बनावट नोटा तयार करणारे प्रिंटर, स्कॅनर जप्त केले आहे.
आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
साकेगाव येथे गुरूवार, 19 रोजी तब्बल 22 हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या तर शहनाज अमीन भोईटे (35, पाण्याच्या टाकीजवळ, साकेगाव) व हनीफ अहमद शरीफ देशमुख (लाखोली, नाचणखेडा, ता.जामनेर) यांना अटक करण्यात आली होती. महिलेसह दोन्ही संशयीतांना शुक्रवारी न्यायालयाने 24 जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, स्कॅनर हे खराब झाल्याने ते दुरूस्तीसाठी जळगाव येथे टाकल्याने ते गोलाणी मार्केटमधील एका दुकानातून पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे.
लाखोलीत आढळल्या 20 हजारांच्या बनावट नोटा
जळगाव येथून पथक थेट जामनेर तालुक्यातील नाचणखेड जवळील लाखोलीत धडकले. संशयीत हनीफ देशमुख यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता पोलिसांना तेथे 20 हजारांच्या बनावट नोटा आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणात दोन संशयीतांसोबत अजून कोणी या रॅकेटमध्ये सहभागी आहे वा यापूर्वी कुठे-कुठे नोटा वितरीत केल्या करण्यात आल्या याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार, हवालदार युनूस शेख, योगेश पालवे, रीयाज शेख करीत आहेत.