मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने सुनावणीकरिता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, गिरणा साखर कारखाना वाचविण्यासाठी नवीन स्थापन केलेल्या कंपनीत अपहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांना मालेगावमधील कंपनीच्या सर्वसाधारण सभेत येऊन अपहार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आमंत्रण दिले होते.
मात्र, संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे राऊतांनी आपली बदनामी केल्याचे सांगत मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, २३ ऑक्टोबरला याप्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे न्यायालयाने संजय राऊत यांना या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.