पुष्पास्टाईल अवैध मद्याची वाहतूक रोखली, 17 लाखांचा मद्यसाठा जप्त; धुळे गुन्हे शाखेची कारवाई

धुळे : धुळे गुन्हे शाखेने अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला असून त्यातून 17 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे अवैधरीत्या दारू वाहतूक पकडली जावू नये यासाठी ट्रकमध्ये विशेष कप्पा बनवण्यात आला होता मात्र पोलिसांच्या कारवाईत ‌‘पुष्पा स्टाईल’ मद्य वाहतुकीचा डाव फसला असून आरोपींना बेड्या पडल्या आहेत.

प्रद्यन्म जितनारायण यादव (25, रा.गांधीनगर, कांदीवली पश्चिम, नुराणी मशिद जवळ, मुंबई), विरेंद्र कल्पनाथ मिश्रा (35, रा.कामनरोड, रजत अपार्टमेंट, पहिला मजला रूम नं. 301, गणेश मंदीराजवळ, वसई, जि.पालघर), आयशर चालक श्रीराम सुधाकर पारडे (32, रा.सुचकनाका, नेतेवली कल्याण, शिळरोड दुबे किराणा स्टोअर्स, मुकादम चाळ समोर, कल्याण), राकेश रामस्वरूप वर्मा (60, रा.सविना खेडा माताजी मंदीर जवळ, उदयपूर, जि.उदयपूर, राजस्थान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने परराज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या मद्यासाठा महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर नगावजवळ नाकाबंदी करण्यात आली. एक स्विफ्ट कार व तिच्या सोबत एक आशयर वाहन येत असताना पोलिसांनी दोन्ही वाहने अडवल्यानंतर संशयित उलट-सुलट उत्तर देत असल्याने वाहनांची झडती घेतली असता विशेष कप्प्यात दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. आयशर वाहनात सिमेंटच्या पत्र्यांच्या खालील विशेष कप्प्यात दारू साठा लपवल्याचे स्पष्ट झाले. 13 लाखांचा आयशर ट्रक (एम.एच.05 ए.एम.7176) व सात लाखांची स्वीप्ट (एम.एच.47 बी.एल.2967) तसेच 16 लाख 89 हजार 600 रुपयांचा मद्यसाठा मिळून 36 लाख 89 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांविरोधात धुळ्यातील देवपूर पश्चिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, चाकल राजेंद्र गीते आदींच्या पथकाने केली.