पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक; कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने साधला नेम

Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर आता कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत भारतला आणखी एक मेडल जिंकून दिले आहे.

कोल्हापुर मध्ये जन्मलेला स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचला आहे. त्याने करिष्मा करत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. त्याच सोबत खाशाबा जाधवांच्यानंतर स्वप्नील कुसळेने महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे.

भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत एकूण 590 गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघ्यावर बसून 198, झोपून 197 आणि नंतर उभे राहून 195 गुण मिळवले.

72 वर्षांनी महाराष्ट्राची मोहर
कुस्तीपटू खाशाबा जाधव हे भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले होते. त्यांनी 1952 साली ही कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर 72 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतासाठी पदक मिळवून देण्यात अपयश आलं होतं. अनेक वेळा पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र अखेर स्वप्निलने महाराष्ट्राची पदकाची तब्बल 7 दशकांची प्रतिक्षा संपवली आहे.