पैशांच्या परतफेडीवरून वाद; शिवसेना पदाधिकाऱ्याला आयुष्यातून उठवलं, सर्वत्र खळबळ

Crime News : पैशांच्या परतफेडीवरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. नंतर त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. हा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला असून, या हत्येप्रकरणी चितळसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अक्षय ठुबे (वय २५) असे या तरुणाचे नाव असून, तो शिवसेनेच्या शिंदे गटाचा पदाधिकारी (उपशाखाप्रमुख) असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींनी त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाइल काढून घेतल्याची बाबही समोर आली आहे.

या घटनेनंतर ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीने कळस गाठला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तक्रारीनंतर गुरुनाथ, सावरा आणि प्रशांत यांच्याविरुद्ध गुरुवारी हत्येसह अन्य विविध भादंवि कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला. तिघांनाही तत्काळ चितळसर पोलिसांनी अटक केली असून, आरोपी कोकणीपाडा आणि मानपाडा परिसरात वास्तव्य करतात.

न्यायालयाने आरोपींना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, अक्षय हा शिवसेनेच्या शिंदे गटाचा उपशाखाप्रमुख असल्याचे सांगितले जात आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे करीत आहेत.