पैसे मागत असल्याने अंधारेंवर हात उचलला, जाधव यांनी स्वतः सांगितलं

बीड : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखाकडून उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाणीचे आता पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अंधारे पैसे घेऊन पदांची विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला. अंधारे यांना ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्याकडून मारहाण झाली. अंधारे आपल्या पदाचा दुरुपयोग करून संघटनेतील पदांची विक्री करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः समाज माध्यमांवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून आपण सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचे कबुल केले आहे. सुषमा अंधारे आपल्या पदाचा गैरवापर करत संघटनेतील कार्यकर्ते आणि नेत्यांकडून विविध मार्गांनी पैसे उकळत असल्याचाही आरोप जाधव यांनी केला. यानंतर मातोश्रीवरुन तातडीने प्रकाराची दखल घेण्यात आली आहे. उबाठा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांना चापटा लगावल्याचा काल दावा केला होता. त्यानंतर आज लगेच पक्षाने जाधव यांच्या सह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधून याची माहिती देण्यात आली आहे.

काय म्हणाले आप्पासाहेब जाधव?
“बीडला आज जो प्रकार घडला, आम्ही २० मे रोजी होणारी संजय राऊतांच्या सभास्थळाच्या पाहाणीसाठी सर्व पदाधिकारी उपस्थित होतो. सुषमा अंधारेही तिथे होत्या. त्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत होत्या. कुणाकडून एसीसाठी फर्निचरसाठी पैसे मागत होत्या. मात्र, त्या पदे विकत होत्या. माझेही पद विकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांची आणि माझी बाचाबाची झाली. यात मी सुषमाताईंना दोन चापटा लावल्या.”, अशी कबुली जाधव यांनी दिली.