नंदुरबार : दुष्काळ सदृश्य परिस्थिती, खडकाळ वा माळरानावरील जमिनीतील पाण्याअभावी पिकांचे झालेले हाल, वाढलेला कर्जबाजारीपणा, हाताला रोजगार नाही. हिरावून घेणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी घरदार सोडण्याशिवाय पर्याय नाही. भागातील शेकडो मजूर पोटाच्या खळगीसाठी उसतोडीसाठी जात असतात.
जिल्हयात आजही हातावर पोट असलेल्या भूमिहीन व अल्पभुधारक लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी हेळसांड सुरू आहे. घरातील आर्थिक चणचणीमुळे भांडणे ऐकून चिमुकले भेदरतात. या काळजाच्या तुकड्यांना निदान पोटभर खायला मिळावे ही आस बाळगत बिर्हाड पाठीवर घेऊन जिल्ह्यातील मजूर जात असतात.
धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील बिलगाव येथील मिठ्या पावरा आणि जुरदार पावरा दोघे अपंग आदिवासी बंधूं देखील पायांनी अधू असतानाही ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातील शहादा तालुक्यात दाखल झाले आहेत. शिक्षणाचा अभाव असल्याने शासकीय योजनेचा त्यांना गंधही नाही. म्हणून कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हे दिव्यांग बंधू ऊस तोडणी करीत आहेत. आपल्या शारीरिक अपंगत्वाचा कुठलाही बाऊ न करता स्वतःच्या जिद्दीवर ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहेत, हेच विशेष आहे.
दरम्यान, एकीकडे आपण जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाठ थोपटवून घेत असताना समाजातील अनेक घटकापर्यंत याची फळेच पोहचलेली नाहीत असे दुर्दैवी चित्र आहे. सातपुड्याच्या दुर्गम भाग असलेल्या बिलगाव येथील दोन अपंग भावांचा पोट भरण्यासाठी सुरु असलेला संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. एकीकडे शासन तुमच्या दारी असे सांगत सरकार लोककल्याणाच्या आणाभाका घेत आहे. दुसरीकडे या दोघा ऊस तोड अपंगांच्या मदतीसाठी कोणतीही सरकारी योजना धावून येत नसल्याचा विरोधाभास दिसत आहे.