पोट अन् पाठीवर हल्ले, फाटलेले कपडे आणि चिरडलेला चेहरा; यशश्रीसोबत नेमकं काय झालं ?

नवी मुंबईतील उरणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे या तरुणीची निघृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. प्रेम प्रकरणातील बदल्याच्या भावनेतूनच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

उरण शहरातील एनआय हायस्कूलसमोरील प्रतीक अपार्टमेंटमध्ये यशश्री शिंदे आईवडील व धाकट्या दोन बहिणींसह राहत होती. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत ती काम करीत होती. गुरुवारी कामाला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली. याप्रकरणी नातेवाईकांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शनिवारी उरण कोटनाका पेट्रोलपंपाजवळील मैदानावर छिन्नविछिन्न अवस्थेमधील तिचा मृतदेह आढळला.

मी संकटात, मला वाचवा…
यशश्री बेपत्ता झाल्यानंतर गुरुवारी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता तिने एका मैत्रिणीला फोन करून मी संकटात आहे. मला कुणीतरी मदत करा, वाचवा असे सांगितले होते. याची माहिती पोलिसांना देऊनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. वेळीच कारवाई केली असती तर माझी मुलगी जिवंत असती असा गंभीर आरोप आई रेश्मा शिंदे व नातेवाइकांनी केला आहे.

पोलिसांनी सांगितली तपासाची दिशा
यशश्री शिंदे ११वीत असताना तिच्याशी गैरवर्तन, अश्लील चाळे करण्याचा व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाऊद शेख या तरुणावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. जामिनावर सुटका झालेल्या दाऊदनेच तिची हत्या केली असावी, असा कयास व्यक्त करून त्या दिशेनेच तपास सुरू आहे, असे उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोटे-पाटील यांनी स्पष्ट केले.