पोलिसांना राखीचे बंधन; सुरवाणी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींची अनोखी राखीपौर्णिमा

धडगाव : तालुक्यातील सुरवाणी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त धडगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पोलीस निरीक्षक आय.एन. पठाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या.

बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत.

आज सोमवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सुरवाणी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष धडगाव पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक आय.एन. पठाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला.

धडगाव तालुक्यातील सुरवाणी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या सुट्टी निमित्ताने घरी न जाता अनोख्या पद्धतीने हा रक्षाबंधन सण साजरा केला. दरम्यान, आश्रम शाळेच्या वतीने पहिल्यांदाच रक्षाबंधनाचा असा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती अधीक्षक अमोल पवार यांनी दिली.