पोस्ट मास्तरच्या झोपा, कर्मचाऱ्यांच्या गप्पा आणि नागरिकांना थापा !

पाचोरा : नगरदेवळा येथील टपाल कार्यालयात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी  सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, केंद्र सरकार मार्फत चालणाऱ्या अतिमहत्त्वाच्या या विभागाबद्दल तक्रार करावी तरी कुणाकडे ? असा प्रश्न नागरिकांना पडलेला असून वरिष्ठांनी याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
अनेकदा बऱ्याचशा लोकांचे आधार कार्ड घरपोच दिली जात नाहीत, बँकांचे पोस्टामार्फत येणारे एटीएम वितरित केले जात नाहीत, विविध शासकीय पदांसाठी नोकर भरती बाबत येणारे टपाल सदर उमेदवार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, आधार कार्ड सेंटरवर येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असून सुद्धा केवळ मोजक्या लोकांनाच ही सुविधा देऊन उर्वरित लोकांना खाजगी सेंटरचा रस्ता दाखवला जातो. साध्या स्वरूपाचे टपाल वितरित केले जातच नाही. घरी टपाल येणे अपेक्षित असलेल्या नागरिकांना प्रत्यक्ष टपाल कार्यालयात जाऊन टपालाची सतत विचारपूस करावी लागते व तेथे विनंती करून टपाल मिळवावे लागते.
आजकाल केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या अनेक योजना या टपाल खात्यामार्फत लागू होत असतात. त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर टपाल कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. परंतु चौकशी करणाऱ्या नागरिकांना नेट चालत नाही, साहेब आले नाहीत, आम्हाला माहिती नाही, कर्मचारी रजेवर आहेत, ते आमचे काम नाही अशा प्रकारची उत्तरे, तीही उद्धटपणे देऊन नागरिकांचे पोस्टात येणे प्रतिबंधित केले जाते.
येथील टपाल कार्यालयाचे प्रमुख असलेले सब पोस्ट मास्तर आर के माळी हे बरेचदा दुपारी झोपा काढताना आणि कर्मचारी गप्पा झोडतांना आढळून येतात. तसेच टपाल कार्यालयाची वेळ सकाळी साडेनऊ ते चार अशी असून देखील कुणी साडेदहाला, तर कुणी साडेअकरा वाजता येत असतात. तसेच घरी जाण्याच्या वेळेचे बंधन कुणाही कर्मचारीवर नाही. येथे कार्यरत असलेले नगरदेवळा गावासाठीचे पोस्टमन बडगुजर हे तर नियमितपणे रोज दुपारी दोन वाजताच घरी निघून जातात आणि पोचपावती व रजिस्टर नसलेले साधे टपाल ते आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत टाकून घरी घेऊन जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.