भुसावळ : शहरातील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी आलेल्या दोघा तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याने मृत्यू झाला तर सुदैवाने तिघे काठावरच पाण्यात पोहत असल्याने बचावले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. शेख दानीश शेख जाबीर (17, रा.ग्रीन पार्क, 32 खोली, भुसावळ) व अंकुश दौलत ठाकूर (17, ग्रीन पार्क, 32 खोली, भुसावळ) अशी मृतांची नावे आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुदैवाने तिघे बचावले
खडका रोड, जामनेर रोड भागातील पाच तरुण रविवारच्या सुटीनिमित्त पोहण्यासाठी राहुल नगर भागात तापी पात्रात गेल्यानंतर तीन मुले तापीच्या काठावरच पाण्यात पोहत होती मात्र शेख दानीशसह अंकुश ठाकूर हा तरुण पोहताना खोल पाण्यात गेल्याने बुडू लागल्याने काठावरील तरुणांनी आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. पट्टीच्या पोहणार्यांना मयत युवकांचा मृतदेह बाहेर काढला. तरुणांना डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे हलवले असता त्यांनी तपासून मृत घोषित केले. दोघा तरुणांचे मृतदेह ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. कुटूंबियांना तरुण मुलांचा मृत्यूची वार्ता कळताच मोठा धक्का बसला. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.