मुंबई । राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. अशातच आता लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत
सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरीत करण्यात येईल.
अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते आलेले आहेत. या दोन हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये आले आहेत. सरकारचा पहिला कार्यक्रम पुणे आणि दुसरा नागपूर नंतर तिसरा कार्यक्रम रायगड येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.