दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. विशेषत: यामुळे सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार आहे. ५ सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडले जाणार आहे.
५० टक्के पदांची भरती
राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावरून भरली जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी हे करावे
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. सुरवातीला प्रोफाईल तयार करून घ्यावे लागेल. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
एका जागेसाठी तीन उमेदवार
दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना रिक्तपदांची जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार त्या खासगी संस्थेत पाठविले जातील. त्यांची निवड मुलाखतीतून होणार आहे.
आता तातडीने बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली जात आहे. पाच-सहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील सूत्रांनी बोलताना दिली.अंदाजे २३ हजार जागांची भरती राज्यात मागे २०१७मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही.
विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षकांअभावी हाल होवू नये या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश आहे.