प्रवाशांचा संताप; रेल्वेमधील लाईट, एसी बंद पडल्याने टीसीला पकडून टॉयलेटमध्ये कोंडले

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात दोन बोगींमध्ये वीज बिघाड झाल्याने लाईट, पंखे व एसी बंद पडल्याने संतंप्त प्रवाशांनी टीटीईला पकडून टॉयलेटमध्ये कोंडल्याची घटना घडली आहे. रात्री एक वाजता वीज पुरवठा खंडित झाल्याने तब्बल दोन तास रेल्वे रोखून ठेवत लाईट व एसी सुरु झाल्यानंतरच रेल्वे पुढे रवाना करण्यात आली. दिल्ली जवळील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशातील गाझीपूरला जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस आनंद विहार येथून वेळेवर रवाना झाली. आपला हॉर्न वाजवून पुढे गेली एवढ्यात दोन डब्यांतील लाईट गेली. वीज बिघाड झाल्यामुळे एसीही बंद पडला. यामुळे प्रवशांचा संताप वाढला. उष्णतेमुळे डब्यातील लहान मुले व महिलांची अवस्था बिकट होती. B1 आणि B2 डब्यातील प्रवासी ट्रेनमधील टीटीई पाहून संतापले. प्रवाशांनी सगळा राग त्याच्यावरच काढला. ट्रेनमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला आणि टीटीईला पकडून शौचालयात कोंडले.

हे प्रकरण वाढताच रेल्वेचे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा हा प्रकार वाढत गेल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत रेल्वेच्या दोन डब्यातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानंतर खंडित वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ट्रेन पुढे रवाना झाली.