प्रवाशांना दिलासा! भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ

भुसावळ । सणासुदीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ करण्यात आलेली आहे. याच दरम्यान, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धावणाऱ्या काही गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ झाली. मध्य रेल्वेने धुळे-दादर गाडीचा कालावधी तीन महिन्यांसाठी वाढविला आहे. तर दुसरीकडे मनमाड येथून सुटणारी मनमाड-दादर या गाडीच्या कालावधीही दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे.

धुळे-दादर ही गाडी आता २ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. दरम्यान, धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे नव्हती. धुळे-चाळीसगाव रेल्वेला दोन मुंबई बोगी लावण्यात येत होत्या. पुढे या दोन्ही बोगी अमृतसर एक्स्प्रेसला जोडण्यात येत होत्या. मात्र लॉकडाऊनच्या काळात ही सेवा बंद झाली होती. तेव्हापासून धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांचे होते… हाल होऊ लागले त्यामुळे खासदार डॉ. भामरे यांनी सतत पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाने धुळे-दादर एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर २९ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली.धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांचे होते

ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावते. प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून या रेल्वेला जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ पर्यंत पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. दरम्यान आता आगामी काळात असलेले सण, उत्सव लक्षात घेऊन रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा धुळे-दादर रेल्वेला २ जानेवारी २४ पर्यंत तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ०१०६५ दादर- धुळे एक्स्प्रेस सोमवार, शुक्रवार व रविवारी तर ०१०६६ धुळे-दादर ही गाडी सोमवार गुरुवार व शनिवारी धावणार आहे.

दुसरीकडे मनमाड येथून सुटणारी ०२१०२ मनमाड – दादर विशेष गाडीचा कालावधीही दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. ही गाडी ४ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत धावणार आहे. तर ०२१०१ दादर – मनमाड विशेष गाडी ४ ऑक्टोबर ते ०१ जानेवारी २०२४ पर्यंत धावेल.