नवी दिल्ली । अयोध्येत रामलला विराजमान झाले आहेत. यामुळे ५०० वर्षाची प्रतीक्षा अखेर संपुष्ठात आली असून यामुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाला उपस्थित राहून दिल्लीत परतले. दिल्लीत येताच पीएम मोदींनी सौर योजनेची घोषणा केली.
पंतप्रधान मोदी दिल्लीत पोहोचताच. एक बैठक झाली ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की सरकार 1 कोटी घरांवर सौर रूफटॉप सिस्टीम बसविण्याच्या लक्ष्यासह ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करेल. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशभरातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे विजेवरील अवलंबित्व कमी होईल आणि पैशांचीही बचत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या X सोशल मीडिया हँडलवर लिहिले, ‘जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज, अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळाले की, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.