नवी दिल्ली : जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांचे नाव समोर आले आहे. यामुळे प्रियांका गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातील चार्जशीटमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, त्यांना या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले नाही.
रॉबर्ट वड्रा आणि थंपी यांच्याबरोबरच प्रियंका गांधींनीही फरिदाबादमध्ये जमीन खरेदी केली होती. रॉबर्ट वड्रा यांचे निकटवर्तीय संजय भंडारी यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सध्या ईडी करत आहे. या तपासातूनच ही माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
फरिदाबाद येथील अमीपूर येथे सन 2005-2006 एचएल पाहवा या प्रॉपर्टी डिलरकडून रॉबर्ट वड्रा यांनी जमीन खरेदी केली होती. ही जवळपास 40.8 एकर इतकी आहे. ही जमीन 2010 साली पुन्हा पाहवा यांनाच विकण्यात आली होती. याशिवाय प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या नावानेही जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन देखील अमीपूर गावातील होती. 2006 मध्ये या जमीनीचा व्यवहार झाला होता. यानंतर 2010 मध्ये ही जमीन देखील विकण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पाहवा हे सीसी थंपी यांच्या निकटवर्तीय आहेत. अमीपूरमध्ये थंपी यांनीही जमीन खरेदी केली होती.