प्रेमीयुगुल मध्यरात्री बाईकसह विहिरीत कोसळले, युवतीचा मृत्यू

सांगली : अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यात युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून युवक बचावला आहे. याबाबत तासगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सूत्रानुसार, तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन प्रेमीयुगुल बुधवारी गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी तरुण निघाला होता. घरी परतत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले.

युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व रात्रीत चाचपडत विहिरीबाहेर आला, पण युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत.

या घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशन मधून कळले असता भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि एचईआरएफ रेस्क्यू टीम सांगली महेश कुमारमठ, फिरोज शेख, मारुती कोळी, यशवंत गडदे, सय्यद राजेवाले, निलेश शिंदे, अनिल कोळी, यांनी मृतदेह व मोटरसायकल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली.