---Advertisement---
जळगाव : किरकोळ वादातून प्रेयसीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच प्रियकरानेही स्वतःला संपवलं. ही घटना भुसावळ येथे शनिवारी उघडकीस आली. दोघेही लवकरच लग्न करणार होते. मात्र, संसार सुरू होण्याआधीच दोघांनी जगाचा निरोप घेतला. कुणाल मनोज भालेराव (२२) आणि काजल गौतम सपकाळे (२०) असे मृत दोघांचे नाव आहे.
भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहुल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव (२२) याचे काजल गौतम सपकाळे (२०) या तरुणीवर प्रेम होते. या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोघे विवाह करणार होते, अशी माहिती आहे.
मात्र शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजलने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. दरम्यान, काजलच्या निधनाची वार्ता येताच कुणालने थेट तापी नदीचा पूलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशिरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
---Advertisement---