प्रेयसी धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होती; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

छत्तीसगडमधील मुंगेली येथील शैलेंद्र जैस्वाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण पोलिसांनी उकलले आहे. प्रेयसीकडून ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराच्या दबावामुळे शैलेंद्र जैस्वाल यांनी आत्महत्या केली होती. मृताने लिहिलेल्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर जुळल्यानंतर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. याशिवाय दबाव टाकणाऱ्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे. मृतकासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली महिलेने दिली आहे.

लोरमी नगर पंचायतीतील रहिवासी शैलेंद्र जैस्वाल यांचा मृतदेह 15 जुलै 2023 रोजी  विजेच्या खांबाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. लोर्मी पोलिसांना मृतदेहाजवळून एक सुसाईड नोटही सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये सोनिया लाक्रा नावाच्या मुलीचा उल्लेख आहे, तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता.

या चिठ्ठीत तरूणाने लिहिले होते की, 2018 मध्ये या तरुणीशी त्यांची ओळख झाली होती. दोघेही मोबाईलवर तासनतास बोलत असत. दरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंधही निर्माण झाले. याचा फायदा घेत ही तरुणी तरुणावर धर्मांतरासाठी दबाव आणत होती. महिलेने मयताकडून 20 हजार रुपयेही उकळले होते. यानंतरही धर्मांतरासाठी सतत दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून शैलेंद्र यांनी किओस्का सेंटरपासून काही अंतरावर असलेल्या शेतातील खांबाला गळफास लावून आत्महत्या केली.