मुंबई : मुलूंड चेक नाक्यावर मनसेतर्फे केल्या जाणाऱ्या आंदोलनाला आता राज्य सरकारतर्फेही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हीडिओ दाखवत फिरत आहेत. त्याला देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यातील टोलसंदर्भात विधान केले होते याबद्दल सविस्तर भूमिका उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत मांडण्यात आली आहे.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील टोलमाफीसंदर्भात एक विधान केले होते. त्याबाबत माध्यमांमधून नेमक्या निर्णयासंदर्भात विचारणा होते आहे. त्याबाबतची माहिती अशी, ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ पथकर स्थानकांवरील व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी १ पथकर स्थानकावरील अशा एकूण १२ पथकर नाक्यांवरील पथकर वसुली बंद करण्यात आली आहे.
“सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ पथकर स्थानके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ पथकर स्थानकावरील अशा एकूण ५३ पथकर स्थानकांवरील कार, जीप व एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून पथकरातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुद्धा २०१७ मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा जीआर सुद्धा ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आला.”, असेही कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज ठाकरेंचं म्हणणं काय?
मनसे नेते राज ठाकरे यांनी टोल हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. मनसेकडुन विनाटोल वाहने सोडण्याचा प्रकार सुरू आहे.