सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एका पोलिस ठाण्याच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांना व्यासपीठावर भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी त्यांनी भाषणात वाचून दाखवली. यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्हाला ‘थेट बारामतीहून आर्शीवाद आला आहे, इकडून तिकडून आलेला नाही, असं म्हणताच एकच हशा पिकला.
फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना एक चिठ्ठी आली. ही चिठ्ठी एका वारकर्यांनी पोलीस अधिक्षकांना दिली होती. ही चिठ्ठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. या चिट्ठीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानण्यात आले होते. वारकर्यांसाठी विमा योजना जाहीर केल्याबद्दल वारकर्यांच्या वतीने सरकारचे आभार मानले होते. यात खाली ह.भ.प.इंद्रसेन आटोळे, बारामती असं लिहिण्यात आले होते. या चिठ्ठीचे वाचन करताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही चिठ्ठी बारामतीहून आली असल्याचे सांगितले.
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असून लाखो वारकर्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे.
वारी कालावधीत एखाद्या वारकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल.