जळगाव । मार्च महिन्याला सुरुवात झालेली नाही त्योवर जळगावातील तापमानाचा पारा वाढत असल्याचे दिसत आहे. रविवारी जळगावाचा पारा ३६ अंशापर्यंत पोहोचला आहे. यामुळे दिवसा जळगावकरांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आगामी काही दिवस जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊन, तापमानात वाढ किंवा घट, ढगाळ वातावरण असे बदल होण्याचा अंदाज आहे.
राज्यातील अनेक भागात थंडी गायब झाली आहे. यामुळे दिवसा उन्हाचे चटके बसत आहे. यंदा नोव्हेंबर ते जानेवारी या तीन हिवाळी महिन्यांमध्ये थंडी गायबच राहिली. त्यामुळे हिवाळ्यातील सरासरी तापमानात १ ते २ अंशाची वाढ झाली. आता फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा ३६ अंशावर पोहोचला आहे
यंदा उन्हाळ्याचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात दोन ते तीन उष्णतेच्या लाटादेखील निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पारा ४० अंशाच्या पुढे जाण्याचीही शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा कडक राहण्याचा अंदाज आहे. अनेकवेळा उष्णतेच्या लाटा निर्माण होणार असून, पारा एप्रिल-मे महिन्यात पारा ४५ अंशाच्या पुढे राहण्याचाही प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मे महिन्यानंतर ‘ला लिना’ची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.