फैजपूर : शहरातील श्रीराम थिएटरमध्ये शुक्रवारी 12 ते 3 दरम्यान ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे प्रसारण सुरू असताना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक चित्रपट पाहत असताना काही उपद्रवींनी पाठीमागील बाजूने येवून चित्रपट गृहाच्या पत्र्यांवर दगड भिरकावल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर जमाव संतप्त झाला तर सुभाष चौकात वार्ता धडकताच व्यावसायीकांनी दुकाने बंद केली.
पोलिसांनी केले शांततेचे आवाहन
देशभरात द केरला स्टोरीला वाढता प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता काही उपद्रवींनी चित्रपटाच्या पाठीमागून बाजूने पत्र्यांवर दगडफेक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही वार्ता सुभाष चौकात धडकल्यानंतर व्यावसायीकांनी पटापट दुकाने बंद केली तर पोलिसांना माहिती कळताच सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर व सहकार्यांनी धाव घेत गर्दी पांगवली.
अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी सुमारे 40 उपद्रवींवर फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चित्रपट गृहाचे चालक विक्की प्रकाश आठवणी यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, सिद्धेश्वर आखेगावकर व ग्रामस्थांनी शांततेचे आवाहन केले आहे.