भोपाळ : आगामी काही महिन्यांत मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येथे काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, पोस्टर बाजी रंगली आहे. दरम्यान, यावरून पैशांची ऑनलाईन देवाणघेवाण करणारी कंपनी ‘फोनपे’ने काँग्रसेला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २३ जूनला मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याविरोधात भोपाळमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती. या पोस्टरवर क्यू-आर स्कॅनर लावण्यात आलं होतं. तसेच, कमलनाथ यांना ‘भ्रष्टाचार नाथ’ आणि ‘फरार’ असं म्हटलं होतं. नंतर त्याच दिवशी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने भोपाळमध्ये पोस्टरबाजी केली. या पोस्टरवर ‘फोनपे’च्या लोगोसह क्यू-आर स्कॅनमध्ये शिवराज सिंह चौहान यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर लिहिलेलं की, ५० टक्के कमिशन द्या आणि तुमचं काम करा.
काँग्रेसने केलेल्या या पोस्टरबाजीवर ‘फोनपे’ने आक्षेप घेत कारवाईचा इशारा दिला आहे. ट्वीट करत ‘फोनपे’ने म्हटलं की, अनधिकृत पद्धतीने ‘फोनपे’ लोगोचा वापर करण्यात आला आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. आमच्या कंपनीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. त्यामुळे मध्य प्रदेश काँग्रसने लावलेले पोस्टर काढून टाकावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
PhonePe objects to the unauthorized usage of its brand logo, by any third party, be it political or non-political. We are not associated with any political campaign or party.
— PhonePe (@PhonePe) June 26, 2023