कर्नाटकमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने बसचे भाडे वाचवण्यासाठी बुरखा घातलेला आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, त्या व्यक्तीने बुरखा घातला आहे आणि त्याच्याकडे बॅगही आहे. कर्नाटक सरकारच्या शक्ती योजनेंतर्गत मोफत बस प्रवासामुळे तिकीट काढू नये म्हणून त्याने बुरखा घातला होता.
वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील आहे, जिथे बस स्टॉपवर एक व्यक्ती बुरखा घातलेला दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, वीरभद्रय्या मठपती असे या व्यक्तीचे नाव आहे. लोकांना संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडे जाऊन चौकशी सुरू केली. त्या व्यक्तीने स्वतःचा बचाव करण्यास सुरुवात केली आणि दावा केला, ‘मी भीक मागू शकण्यासाठी हा बुरखा घातला आहे…’ मात्र, त्याच्या उत्तराने लोकांचे समाधान होऊ शकले नाही. एवढेच नाही तर या व्यक्तीकडून महिलेच्या आधार कार्डची फोटो कॉपीही सापडली आहे.
शक्ती योजना म्हणजे काय?
शक्ती योजनेंतर्गत कर्नाटकातील महिलांना राज्यातील सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येतो. काँग्रेस पक्षाच्या पहिल्या पाच निवडणूक हमीपैकी ही एक आहे जी गेल्या महिन्यातच लागू करण्यात आली आहे. दररोज 41.8 लाखांहून अधिक महिला प्रवाशांना या मोफत प्रवास सेवेचा लाभ मिळत आहे. अधिका-यांनी सांगितले की, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अंदाजे 4,051.56 कोटी रुपये खर्च होतील, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली.
शक्ती योजना फक्त कर्नाटकच्या सामान्य सरकारी बस सेवांवर लागू आहे. ऐरावत, ऐरावत क्लब क्लास, ऐरावत गोल्ड क्लास, अंबारी, अंबारी ड्रीम क्लास, अंबारी उत्सव, फ्लाय बस, वायु वज्र, वज्र, नॉन-एसी स्लीपर, राजहंस आणि ईव्ही पॉवर प्लस एसी बस या योजनेंतर्गत वगळण्यात आल्याची माहिती आहे.