बदलापूर । बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बदलापुरात लैंगिक अत्याचाराची घटना घडली. धक्कादायक म्हणजे जन्मदात्या बापानेच पोटच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर तिला अमानुष मारहाण देखील केली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलंय. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलगी आपल्या आईसह बदलापूरमधील एका परिसरात राहते.
तिची आई एका कंपनीत कामाला असून रात्री उशीरा घरी येते. 22 ऑगस्टच्या रोजी पीडिता अचानक घर सोडून पळून गेली होती. शोध घेऊनही थांगपत्ता न लागल्याने पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू करण्याआधीच पीडिता पुन्हा घरी आली.
आईने तिला विचारणा केली असता, 22 ऑगस्टच्या रात्री वडिलांनी मारहाण करत माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असं पीडितेने सांगितले. मुलीवर अत्याचार झाल्याचे कळताच आईने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.