बसमध्ये चढताना महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास; एरंडोल बसस्थानकावरील घटना

एरंडोल : येथील बसस्थानकावर संगिता झुंबरसिंग पाटील या खडके खुर्द गावी जाण्यासाठी, एरंडोल-भडगाव बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील ६४००० रू.किमतीची २० ग्रॅम वजनाच्या सोन्याची बांगडी लंपास केली. २२ मे दुपारी ३.३० ते ३.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगिता झुंबर सिंग पाटील या मुळ खडके खुर्द येथील रहिवासी असून त्या जळगाव येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्या दुपारी जळगाव ते एरंडोल बसने एरंडोल बसस्थानकावर उतरल्या. त्यानंतर ३.३० वाजेच्या सुमारास एरंडोल भडगाव बस लागल्याने त्या घरी परतण्यासाठी बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील किंमती सोन्याची बांगडी लंपास केली.

सदर प्रवासी महिलेच्या दोन्ही हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. बसमध्ये बसल्यावर त्यांनी बांगड्या तपासल्या असता उजव्या हातातील बांगडी चोरी झाल्याचे आढळून आले. पोलिस निरीक्षक सतीश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश महाजन, संतोष चौधरी हे तपास करीत आहेत.