बसवर केलेल्या दगडफेकीत पाच वर्षीय बालिका जखमी ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ । मेहकर-भुसावळ बसवर एका तरुणाने दगडफेक केली. या दगडफेकीत बसमधील एक पाच वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील वरणगावनजीकच्या सातमोरी पुलाजवळील घडली. देवांशी स्वप्नील सुलताने (5, गुंजखेडा, ता.लोणार, जि.बुलढाणा) असं जखमी झालेल्या बालिकेचं नाव असून याबाबत संशयीत विशाल संजय बोंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
मेहकरवरून भुसावळला येत असलेली बस (एम.एच. 40 एन.9941) महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल आमत्रंणजवळ आली असता विशाल संजय बोंडे हा दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.आर 5043) वर मोबाईलचे हेड फोन लावुन बसच्या पुढे आला व दुचाकी आडवी लावू शिविगाळ करू लागल्याने त्यास समजवण्यासाठी गेल्यानंतर त्याने दगडफेक सुरू केली.

या घटनेत बसचे दोन काच फुटले तसेच बसमधील प्रवाशी देवांशी स्वप्नील सुलताने (5, गुंजखेडा, ता.लोणार, जि.बुलढाणा) या बालिकेच्या डोक्यावर दगड लागल्याने ती गंभीर जखमी झाली. संशयित विशाल बोंडे याने वाहक पिंगळे यांना सुद्धा मारहाण केली. याप्रकरणी बस चालक योगेश यशवंत सांवळे (39, खेडी बुद्रूक, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून विशाल बोंडे याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र तायडे करीत आहे. संशयीत आरोपीला अटक करण्यात आली.