गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याच आगाराचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एसटी चालकाच्या हातात स्टेरिंग ऐवजी छत्री दिसत आहे. हा व्हिडिओ राज्यात सगळीकडं पाहायला मिळाला.
पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बसमध्ये छत्री घेऊन बसला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्याला जोडण्याचे महत्त्वाचे काम ही लालपरी करत असते. आजही राज्यातील प्रत्येक खेड्यातील अनेक लोक या लालपरीनेच प्रवास करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी ही लालपरी फार महत्त्वाची मानली जाते. पण जर तिची अशी अवस्था असेल तर यामुळे नागरिकांचा देखील जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्हिडीओवर सध्या नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अशाच एका बसचा फोटो दाखवला होता. त्यावर महाराष्ट्राच्या गतिमान सरकारची जाहिरात होती. त्यावेळी त्यावर गतिमान सरकारची जाहिरात आणि बसची अवस्था या मुद्द्यावरुन अजित पवारांनी सरकारला चांगलच घेरलं होतं.
अजित पवार हे सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत. त्यामुळे पुन्हा एसटी महामंडळाच्या एसटीच्या बिकट अवस्थांचा मुद्दा उपस्थित केला जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सध्या एसटीची असलेली आर्थिक अवस्था यावर देखील प्रश्न उपस्थित केला जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे.