बुलडाणा: संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील ” भेंडवळची घटमांडणी ” चे अंदाज आज जाहीर करण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडल्यानंतर आज सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. यात पाऊस ,पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचा अंदाज वर्तविण्यात आले आहेत.तर हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. नेमके काय काय अंदाज यावर्षभराचे असतील पाहूया….
गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी करतात. भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं असतं. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.
पावसा संबंधीचे अंदाज
जून – कमी , पेरणी उशिरा होईल
जुलै – सर्वसाधासरण
ऑगस्ट – चांगला , अतिवृष्टी होईल
सप्टेंबर – कमी , अवकाळी पाऊस भरपूर, पिकांचे नुकसान होईल
पीक पाण्यासंबंधीचे अंदाज
आंबाशी कुलदैवत आहे त्यामुळे रोगराई राहील ..
कपाशी मोघम आहे फारशी तेजी नाही
ज्वारी सर्वसाधारण राहील
तूर मोघम पिक चांगले
मुग मोघम सर्वसाधारण
उडीद मोघम सर्वसाधारण
तील मोघम मात्र नासाडी होईल
बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल
भादली रोगराई वाढेल
साळी- तांदूळ चांगलं पिक येईल
मटकी – सर्व साधारण येईल
जवस – सर्व साधारण मात्र नासाडी होईल
गहू – सर्व साधारण बाजार भाव तेजीत राहील
हरभरा – अनिश्चित कमी जास्त पिक येईल.. मात्र नुकसान सुद्धा होईल
राजकीय आणि देशासंबंधीचे अंदाज
एकंदरीत ज्या पद्धतीने सर्वांचे सगळ्यात जास्त लक्ष लागले असते ते म्हणजे राजकीय अंदाज बांधणीवर आणि त्यात पुन्हा एकदा राजा कायम राहील असं भाकीत केल्यामुळे पुन्हा एकदा देशाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती पुढील वर्षी कायम राहील असे भाकीत भेंडवळमध्ये वर्तविण्यात आले आहे. परकीय राष्ट्रांकडून त्रास, मात्र संरक्षण खाते मजबूत राहील, असाही अंदाज यावेळी वर्तविण्यात आला.