बांगलादेशात सर्जिकल स्ट्राईक करा, भाजप नेत्याने पंतप्रधानांकडे का केली ही मागणी ?

बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारात शेख हसीना यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. शेख हसीना बांगलादेशातून बाहेर पडताच, बेफाम जमावाने अल्पसंख्याकांना लक्ष्य केले. हिंदूंची घरे जाळण्यात आली आणि अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदूर येथील भाजप नेते संजय शुक्ला यांनी बांगलादेशबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी भाजप नेते संजय शुक्ला यांनी सर्जिकल स्ट्राईकची मागणी केली आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, त्याचप्रमाणे बांगलादेशमध्येही सर्जिकल स्ट्राईक व्हायला हवे, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. संजय शुक्ला हे काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. त्यांनी कैलाश विजयवर्गीय यांच्या विरोधात निवडणूकही लढवली आहे.

अलीकडेच पीएम मोदींनी मोहम्मद युनूस यांचे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. दरम्यान, ते म्हणाले होते की हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करून आम्ही लवकरच सामान्य स्थितीत परत येऊ अशी आशा आहे.

बांगलादेशच्या 170 दशलक्ष लोकसंख्येपैकी 8 टक्के हिंदू आहेत. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग पक्षाला हिंदू समाजाने पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. हसिना सरकार उलथून टाकल्यानंतर हिंदूंवर किमान २०५ हल्ले झाले. काल, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी हिंदू समुदायावरील हल्ल्यांदरम्यान एका हिंदू मंदिराला भेट दिली. ते ढाक्यातील ढाकेश्वरी मंदिरात गेले.

महंमद युनूस हिंदू समाजाला काय म्हणाले ?
युनूस यांनी हिंदू समाजाला सांगितले की, अधिकार सर्वांना समान आहेत. आपण सर्व एक आहोत आणि आपला हक्क समान आहे. आमच्यात भेदभाव करू नका. कृपया आम्हाला मदत करा. धीर धरा आणि आम्ही काय करू शकलो आणि काय नाही ते नंतर ठरवा. आम्ही अयशस्वी झालो तर आमच्यावर टीका करा. आपल्या लोकशाही आकांक्षांमध्ये आपण मुस्लिम, हिंदू किंवा बौद्ध म्हणून नव्हे तर माणूस म्हणून पाहिले पाहिजे. आमचे हक्क सुनिश्चित केले पाहिजेत. सर्व समस्यांचे मूळ हे संस्थात्मक व्यवस्थेतील बिघाड आहे, त्यामुळेच असे प्रश्न निर्माण होतात. संस्थात्मक व्यवस्था सुरळीत करण्याची गरज आहे.