धुळे : शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गांजाची शेती उध्वस्त केली आहे. या कारवाईत गांजाची ओली झाडे तसेच बांधावर सुकायला ठेवलेली झाडे असा जवळपास कोट्यावधी रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक धिवरे यांनी तात्काळ पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात जवळपास दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचीपर्यंत गांजाची लागवड केली असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सुका गांजा देखील बांधावरती पोलिसांना आढळून आला आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गांजाची ओली झाडे तसेच बांधावर सुकायला ठेवलेली झाडे असा जवळपास कोट्यावधी रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच गांजा लागवड करणाऱ्या संबंधितांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.