जळगाव । जळगाव शहरातून खुनाची घटना समोर आलीय. लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञात इसमाने महिलेच्या घरात घुसून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात रणछोड नगर परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. सुवर्णा राकेश नवाल (वय ५७) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.
शहरातील गणेशवाडी शेजारी असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागील रणछोड नगरात मनकमल बंगल्यात राहणाऱ्या सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.
दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. रात्री उशिरा महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये देण्यात आला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, या हत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाहीय.