पाचोरा : उद्धव ठाकरे काल जळगावमध्ये भाषण करून गेले. मात्र, त्यांच्या भाषणामध्ये देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही. समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही. दलित, आदिवासी, गरीब, ओबीसी यांच्या विकासाचा एकही मुद्दा नाही. मग समाजातल्या गरीबाची गरिबी कशी दूर करणार ? या ठिकाणी त्यांचा अख्ख भाषण अर्धवचन मोदीजींना शिव्या दिल्यात. अर्ध भाषण महायुतीला शिव्या दिल्यात. ही आघाडी जिथे तयार झाली तिथे उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील हे नेता नाही नितीहीन आणि नियतही नाही अशा प्रकारची आघाडी आहे, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
सत्य बोलले पवार साहेब
पवार साहेब म्हणाले की, या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला. त्यांच्या लक्षात आलं आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल. त्यामुळे या ४ जून पर्यंतच शरद पवार साहेबांची पार्टी, उद्धव ठाकरेंची पार्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पवार साहेबांच्या भाकित्यानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं.
बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं…
खरं म्हणजे मी आठवण करून देतो हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचे दुकान मी बंद करेल. आता पोरांनी काँग्रेसची युती तर केलीच पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठासेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याच्या शिल्पकार माननीय पवार साहेब असणारे म्हणजे त्यांचं अस्तित्वच उरणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.