बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ.., थोरातांच्या राजीनाम्यावर सत्यजित तांबे आणि मुलगी जयश्री यांची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे बडेनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली आहे. आता बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर आ. सत्यजित तांबे आणि मुलगी जयश्री थोरात यांची प्रतिक्रिया आली आहे.

जयश्री थोरात यांनी काय म्हटलं? 
साहेबांची (बाळासाहेब थोरात) माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही. साहेब जेव्हा व्यथित होतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं. मात्र यावर मी काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी राजीनाम्याच्या प्रश्नांवर बोलण टाळलं.

सत्यजित तांबे यांनी काय म्हटलं?
बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात साहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर १०० वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे? यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं.

काँग्रेसमध्ये गट वगैरे असतील असं मला वाटत नाही. मला जे बोलायचं होतं ते मी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे घेऊन बोललो. मी माझी भूमिका पुराव्यानिशी मांडली आहे, त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं तांबे यांनी म्हटलं.