बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागांना लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासवांचं संवर्धन केलं जात. ही जागा लाटांच्या तडाख्यानं उद्ध्वस्त झाली आहे. याठिकाणी असलेली सुरुची अनेक झाडे लाटांच्या दणक्यानं जमीनदोस्त झाली आहेत. अनेक झाडं पाण्यात वाहून गेली आहे. दरम्यान हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरुन पुढे सरकलयं.

दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळ १५ जूनला दुपारच्या सुमारास सौराष्ट्र, कच्छच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कच्छ आणि सौराष्ट्र जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून देखील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या समुद्र किनार्‍यालगत असलेल्या गावातील तीस हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ उद्या १५ जूनला कच्छच्या समुद्र किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पाकिस्तानकडे सरकरणार आहे. जसं जसं हे चक्रिवादळ उत्तर-पश्चिमेकडे जाईल तसं तसं ते आणखी रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ हे कराची पासून ३८० किलोमीटर अंतरावर आहे.