मनोज माळी
नंदुरबार : शौचास बसलेल्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ८ रोजी रोझवा प्लॉट (पुर्नरवसित, ता. तळोदा) येथे घडली. या हल्ल्यात अनुष्का जलसिंग पाडवी (२) या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. बालिकेवर स्मशानभूमीअभावी शेतावरच अंत्यसंस्कार करावे लागल्याची वेळ नातेवाइकांवर आली. या घटनेमुळे विस्थापीतानी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या ७० कुटुंबांचे मोड जवळ (ता. तळोदा) येथे सन २०१६ मध्ये शासनाने पुनर्वसन केले आहे. बिबट्याचा हल्यात मयत झालेल्या बालिकेचा कुटुंबास देखील या वसाहतीत घर प्लॉटची जागा मिळाली आहे.तथापि या कुटुंबास रोझवा प्लॉट या ठिकाणी शेत जमीन शासनाकडून मिळाल्याने ते शेतातच झोपडी बांधून राहत आहेत. बालिका बिबट्याचा हल्यात ठार झाली. मयत बालिकेवर अंत्यसंस्कार कुठे करावे ? असा प्रश्न नातेवाईकाना पडला होता. सुरुवातीस आपल्या मूळगावी डनेल ता.अक्कलकुवा येथे नेण्याचा नातेवाईकांनी ठरविले होते. मात्र मूळ गाव लांब असल्यामुळे मयत बालिकेवर शेतावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.त्यानुसार शेवटी रविवारी दुपारी आपल्या शेतात मयत बालिकेवर अंत्य संस्कार करण्यात आले.
वास्तविक मोड पुनर्वसन वसाहत स्थापन होवून साधारण जवळपास आठ वर्षे झाली आहेत. शिवाय कोणत्याही वसाहतीचे पुनर्वसन करताना इतर आवश्यक सुविधा बरोबरच स्मशानभूमी असणे आवश्यक असते. शिवाय प्रकल्प बधितानी सन २०१७ पासून वसाहतीत स्मशान भूमी करण्याची मागणी शासनाचा नर्मदा विकास विभागाकडे केली आहे. तथापि सात वर्षे लोटूनही विस्थापितांचे साधी स्मशान भूमीची मागणी पूर्ण झालेली नाही. सबंधित विभागाचा उदासीन भूमिका बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येवून आता तरी वसाहतीचा स्मशान भूमीच्या प्रश्न नर्मदा विकास विभागाने मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जागे अभावी प्रस्ताव धूळखात
वसाहतीतील बधितांच्या मागणी नुसार सबंधित नर्मदा विकास विभागाने गावातील स्मशान भूमीच्या प्रस्ताव तयार केला आहे.तथापि जागे अभावी हा प्रस्ताव तसाच गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडून आहे. विस्थापितानी गावा जवळील नदीकाठी स्मशान भूमीची मागणी केली आहे.परंतु शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे जागेचा प्रश्न कायम आहे
नर्मदा विकास विभागाने स्मशान भूमीसाठी खासगी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्याचे नियोजन केले आहे.मात्र त्यातही अजून पर्यंत यश आलेले नाही.साहजिकच जागे अभावी मोड पुनर्वसन वसाहतीच्या स्मशान भूमीच्या प्रश्न कायम आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांचे पुनर्वसन करताना इतर नागरी सुविधा बरोबरच स्मशान भूमी असणे आवश्यक असते.परंतु वसाहत स्थापन होवून आठ वर्षे झालीत तरीही बधितांचा हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.मयतावर अंत्य संस्कार करताना विस्थापितांचां नातेवाईकांना लांब मूळ गावाकडे नेण्या शिवाय पर्याय नसतो. नर्मदा विकास विभागाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
नुरजी वसावे, विस्थापित,मोड पुनर्वसन ता तळोदा.
मोड पुनर्वसन वसाहतीतील विस्थापितांना नदीकाठी स्मशान भूमीची मागणी केली आहे.तथापि त्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध नाही.तरीही स्मशान भूमी साठी खासगी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जमीन मिळाल्या बरोबरच स्मशान भूमीचे काम हाती घेण्यात येईल.
आर डी खैरनार कार्यकारी अभियंता.
नर्बदा विकास विभाग.