जळगाव : चाळीसगाव येथील गणेशपूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने आज सोमवारी मयताच्या कुटुंबियांना १० लाखांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उप वनसंरक्षक प्रवीण ए., वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, सरपंच चंद्रकांत देसले, पोलीस पाटील भागवत पाटील, एस.डी.पाटील सर, शरद पाटील, उन्मेष पाटील यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील गणेशपूर परिसरात रिंकेश आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शनिवार, १४ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गणेशपूर पाटणा रस्त्यावर काही लहान मुले रनिंग करत खेळत होती. खेळत असताना रनिंग करत असलेला रिंकेश मोरे हा मागे राहून गेला.
दरम्यान, शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. रिंकेशला ओढत ओढत बाजूच्या शेतात नेले. पुढे निघून गेलेल्या मुलांना रिंकेश दिसला नाही म्हणून त्यांनी रिकेंशचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही.
याबाबत रिंकेशच्या आई वडीलांना कळविण्यात आले. रिंकेशचा शोध घेत असतांना प्रकाश काशिनाथ पाटील यांना तो शेतात मृत अवस्थेत आढळून आला. वनविभागाला पाचारण करण्यात आल्यानंतर अधिकारी यांनी रात्री पंचनामा केला.
या घटनेची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार मयत रिंकेश मोरे च्या कायदेशीर वारसांना एकूण २५ लाखांची मदत मंजूर करण्यात आली. आज १६ रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व मंजूर २५ लाखांच्या मदतीपैकी पहिल्या टप्प्यातील १० लाखांच्या मदतीचा धनादेश मयत सुपूर्द केला. यावेळी उप वनसंरक्षक प्रवीण ए., वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, सरपंच चंद्रकांत देसले, पोलीस पाटील भागवत पाटील, एस.डी.पाटील सर, शरद पाटील, उन्मेष पाटील यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी या नात्याने मोरे कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभा – आमदार मंगेश चव्हाण
स्व.रिंकेश च्या दुर्दैवी निधनामुळे मोरे कुटुंबियांचे झालेले नुकसान न भरून निघणारे असले तरी शासन – प्रशासनातील दुवा या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून २५ लाखांच्या मदतीच्या माध्यमातून मोरे कुटुंबियांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यापैकी १५ लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले जाणार असून भविष्यात याचा उपयोग रिंकेशच्या कुटुंबियांना होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मोरे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.