मनोज माळी
तळोदा : आजोबांसोबत गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाला बिबट्याने हल्ला करून ठार केले. चिनोदा शिवारात आज १३ रोजी सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कार्तिक राजेश पाडवी (८) असे मृत बालकाचे नाव आहे.
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील कार्तिक राजेश पाडवी (८) हा आजोबांसोबत गुरांसाठी चारा आणण्यासाठी आज सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास चिनोदा शिवारात गेला होता. त्याचवेळी बिबट्याने या बालकावर हल्ला करून फरफटत नेल्याने त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, सोबत असलेले आजोबा बालंबाल बचावले.
चिनोदा शिवारातील एका शेतामध्ये या मुलाच्या मृतदेह आढळून आला. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांच्या मुक्त संचार वाढला आहे. शेत शिवारामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना या बिबट्यांचे नियमित दर्शन घडत असते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा. तसेच आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी करूनही वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दलेलपूर शिवारात देखील अशीच घटना घडली असल्याने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिके विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.