लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, माजी प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल शर्मा यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना अनिल शर्मा म्हणाले की, पप्पू यादव यांच्यासारख्या हिस्ट्रीशीटरचा पक्षात प्रवेश झाल्यानंतर आता आपल्याला काँग्रेसकडून कोणतीही आशा राहिलेली नाही.

काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनिल शर्मा म्हणाले की, राहुल गांधी केवळ पप्पू यादवलाच मिठी मारत नाहीत तर लालूंसारख्या दोषी व्यक्तीच्या घरी मटणही खातात. असा पक्ष न्याय आणि राज्यघटनेबद्दल कसा बोलू शकतो ? ते म्हणाले की, मी 1985 मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेतले, तेव्हापासून आजपर्यंत मी सुमारे 39 वर्षे पक्षाची सेवा केली आहे. पण आज जे काही घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. त्यामुळेच मी आता पक्षापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.