नवी दिल्ली । नितीशकुमार यांनी लालुप्रसाद यादव यांची साथ सोडून भाजपसोबत घरोबा निर्माण केला असून त्यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहार पाठोपाठ आता आणखी एका राज्यात सत्ता पालटाची भिती आहे
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात मोठी कारवाई केली असून दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. यावेळी तपास पथकाने काही कागदपत्रे आणि त्याची बीएमडब्ल्यू कार जप्त केली आहे.
मात्र या कारवाईनंतर आज झारखंड मुक्ति मोर्चाने मुख्यमंत्री निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली आहे. जेएमएम प्रवक्त मनोज पांडेय यांनी ही माहिती दिली. “हेमंत सोरेन पळपुटे नाहीत. मुख्यमंत्री लवकरच आपल्यामध्ये असतील. ते कुठे आहेत? हे आम्ही नाही सांगू शकत. ही आमची रणनिती आहे” असं JMM चे प्रवक्ते मनोज पांडेय यांनी सांगितलं.
‘पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत’, असं जेएमएस प्रवक्त्याने सांगितलं. “निवडलेल्या सरकारला ऑपरेशन लोटसपासून वाचवायच आहे. झारखंडला वाचवायच आहे. आदिवासी असणं गुन्हा आहे का?. ते पळपुटे नाहीत. इतकी अस्वस्थतता का आहे? हा आदिवासींचा अपमान आहे. पूर्ण झारखंडचा अपमान आहे. मुख्यमंत्री लवकरच आपल्यामध्ये असतील” असं मनोज पांडेय म्हणाले.