‘बीसीसीआय’ने घेतला ‘या’ खेळाडूंबाबत कठोर निर्णय; आता…

‘बीसीसीआय’ने टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेतला आहे. भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना बोर्डाने दिल्या आहेत. यात यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इशानने ऐनवेळी संघ व्यवस्थापनाकडे ब्रेक मागितला होता, त्यानंतर तो सातत्याने क्रिकेटपासून दूर आहे. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही यावर प्रतिक्रिया देत, ‘इशान किशनला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याला थोडे क्रिकेट खेळावे लागेल’, असा मोलाचा सल्ला दिला होता. मात्र, ईशानने द्रविड गुरुजींच्या सल्ल्याकडे कानाडोळा केला आहे. तो अद्याप एकही रणजी सामना खेळलेला नाही.

बीसीसीआयने 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील फेरीपूर्वी खेळाडूंना आपापल्या रणजी संघात सामील होण्यास सांगितले आहे. इशान किशनसारख्या खेळाडूने रणजी सोडून आयपीएलची तयारी सुरू केली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.