बुलढाण्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; एक ठार, १५ हून अधिक प्रवासी जखमी

बुलढाणा । राज्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. आता अशातच बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली. एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले.

ही घटना चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्या नजीक शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून २० ते २२ प्रवासी प्रवास करीत होते.शुक्रवारी पहाटे बस चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात मालवाहू ट्रक आला.

काही क्षणातच मालवाहू ट्रकने बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेला प्रवासी खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.