तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। दिनांक १४ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयातील विस्तार सेवा समिती व इतिहास विभाग आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुमारे 2000 देशभक्त, आदिवासी नेते व क्रांतीकारकांची माहिती आणि छायाचित्रे अशा दुर्मिळ वारशाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदिर’ हा संस्थेचा अभिनव उपक्रम असून या उपक्रमाचा प्रवास २६ जानेवारी २०२६ पर्यंत म्हणजे ९५६ दिवस चालू राहणार आहे. या उपक्रमाचा ११२ वा दिवस बेंडाळे महिला महाविद्यालयात पार पडला. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयातील कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. विलास पाटील यांनी केले. या उपक्रमाचे प्रास्ताविक व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे या संस्थेचे अध्यक्ष देशभक्त कोशकार चंद्रकांत शांताराम शहासने यांचा परिचय इतिहास विभाग व विस्तार सेवा समिती प्रमुख डॉ. दिपक किनगे यांनी करून दिला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्त, क्रांतिकारक, आदिवासी नेते यांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि देशासाठी त्यांनी केलेला त्याग, बलिदान आणि महान असे कार्य यांची शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती देणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.
हा दुर्मिळ वारसा डिजिटल स्वरूपात संस्थेने महाविद्यालयाला दिला आहे. त्याचे महाविद्यालयातील ग्रंथालयात जतन केले जाईल आणि सदर वारसा महाविद्यालयातील विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवून त्यांच्या उपक्रमास सहकार्य करण्यात येईल.
सदर प्रदर्शनाला उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे, आय क्यू ए सी समन्वयक प्रो. डॉ. स्मिता चौधरी ग्रंथपाल श्री. शिरीष झोपे, महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू- भगिनी आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातील सर्व क्रांतिकारकांच्या माहितीचे तन्मयतेने वाचन केले. तसेच सदर प्रदर्शन माहितीपूर्ण, स्तुत्य आणि आजच्या पिढीसाठी अतिशय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील आणि नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयातील विद्यार्थिनी यांनी सुद्धा मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली. विद्यार्थिनींनाही प्रदर्शनातील विशेषतः जळगाव जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती वाचून आनंद झाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो अधिकारी प्रा. अनिल बेलसरे, डॉ. सुहास चौधरी, प्रा. योगेश कोळी, प्रा. जयंत नेवे, प्रा. राजेंद्र पाटील, प्रा. संध्या फेगडे, प्रा. सागर पाटील यांनी परिश्रम घेतले.